पिंपरी-चिंचवडमधील दिवसेंदिवस फोफावणारी गुन्हेगारी रोखण्याचे कृष्णप्रकाश यांच्यापुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:10 PM2020-09-04T13:10:02+5:302020-09-04T13:12:45+5:30
अवैधधंदे बंद करून गुन्हेगारांना पोलिसांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र दारू पिऊन, नशा करून किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार वाढतच राहिले.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. मात्र, शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्यात अपयश आल्याने दोन वर्षांत दोन आयुक्तांच्या बदल्या झाल्या. सत्ताधाऱ्यांची नाराजी ओढावल्याने आयुक्त संदीप बिष्णाई यांचा तर एक वर्षांचा ही कालावधी पूर्ण झाला नाही.त्यामुळे नवीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यापुढे शहरातील गुन्हेगारी व अवैध धंदे रोखण्याचे आव्हान आहे.
गेल्या वर्षी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. दरम्यान निवडणुकांच्या काळातच आर. के. पद्मनाभन सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांची २० सप्टेंबर २०१९ रोजी पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. २१ सप्टेंबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्याचदिवशी दुपारी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जारी झाली. कम्युनिटी पोलिसिंगवर भर देऊन आयुक्त बिष्णोई यांनी कामकाज सुरू केले.
शहरातील अवैधधंदे बंद करून गुन्हेगारांना पोलिसांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र दारू पिऊन, नशा करून किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार वाढतच राहिले. त्यामुळे अवैधधंदे बंद करण्याची मागणी होऊ लागली. जानेवारीमध्ये ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर ‘अवैध धंद्यांचे आगार’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त बिष्णोई यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून १२२ आरोपींना अटक केली. सव्वा लाखांची दारु व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर सहा महिने अवैध धंदे बंद ठेवण्यात आले. पुन्हा पोलिसांच्या आशीर्वादाने छुप्या पद्धतीने सुरू झाले.
अवैध धंद्यांची मंत्रालयात झाली होती तक्रार...
‘लोकमत’च्या उद्योगनगरी बनतेय ‘अवैध धंद्याचे आगार’ या वृत्तमालिकेची दखल स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले. तसेच, बनसोडे यांनी शहरातील अवैधधंद्यांचा प्रश्न मंत्रालयापर्यंत पोहचविला. त्यामुळे आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली होईल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र गणेशोत्सव आदी सण उत्सव असल्याने बदली झाली नाही. मात्र गणेशोत्सवानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश देण्यात आले.
कॅटकडे धाव घेणार?
आयुक्तपदाचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आल्याने संदीप बिष्णोई हे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. आयुक्त म्हणून बिष्णोई यांनी कोरोना महामारीत समाधानकारक काम केले. कोरोना सेलची स्थापना करून शहर पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी यांना कोरोना चाचणी व उपचारासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली.