पिंपरी : कामगार संघटनेच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने परस्पर १६ लाख ८ हजार रुपये ट्रान्सफर करून संघटनेची आणि कामगार नेत्याची फसवणूक केली. याप्रकरणी संघटनेच्या खजिनदाराला पोलिसांनी अटक केली. पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या कार्यालयात सप्टेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
हेमंत विलास माने (२५, रा. काशीळ, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या खजिनदाराचे नाव आहे. कामगार नेता यशवंत आनंदराव भोसले (६०, रा. उद्यमनगरी, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ८) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार नेता यशवंत भोसले हे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेचे पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे कार्यालय आहे. या कार्यालयात हेमंत माने हा संघटनेचा खजिनदार म्हणून मानधन तत्त्वावर काम करीत होता. संघटनेचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते आहे. या खात्यातून खजिनदार हेमंत माने याने अप्रामाणिकपणे ऑनलाइन पद्धतीने १६ लाख ८ हजार १९ रुपये परस्पर स्वत:च्या खात्यावर व इतर व्यक्तींच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. संघटनेचे अध्यक्ष म्हणून फिर्यादी यशवंत भोसले व राष्ट्रीय श्रमिक संघटनेतील पदाधिकारी व सदस्य यांचा विश्वासघात करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.