भोसरी : ना मूलभूत सुविधांची पूर्तता, ना भविष्याची सुरक्षितता, ना आयुष्याची शाश्वती अशा चक्रव्यूहात शहरातील सव्वालाख कामगारवर्ग दोन वेळच्या अन्नासाठी धडपडत आहे. संघटित कामगारांना संघटनांचा पाठिंबा वेळोवेळी मिळतो व ते आपल्या सुरक्षेचे प्रश्न भक्कमपणे मांडू शकतात पण असंघटित कामगाराला वाली कोण, त्यांच्या अपघाती मृत्यूला कोण जबाबदार, कारखान्यांमध्ये सुरक्षा साधनांच्या पुरवठ्याबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती यंत्रणा कारणीभूत, असे अनेक प्रश्न कामगार सुरक्षेबाबत निरुत्तरित आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा मुख्य कणा असलेला कामगार वगार्ची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे. टाटा मोटर्स, बजाज आॅटो, मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, जनरल मोटर्स, एसकेएफ, अॅटलास कॅप्को, थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया, सॅण्डविक एशिया, अल्फा लाव्हल आदी लहान-मोठे सहा हजार उद्योग पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरात आहेत. या कंपन्यांत लाखो कामगार उदरनिर्वाह करतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करीत असताना यंत्रसामग्री व्यवस्थित व सुरक्षेच्या सूचना वाचून त्याचा वापर कसा करावा, याविषयी प्रशिक्षण दिले जाते. पण लघुउद्योग व छोट्या वर्कशॉपज्ञध्ये चालणा-या कामांमध्ये कामगारवगार्चं सुरक्षेसाठी योग्य साधने पुरवली जात नसल्याने अशा कंपन्यांमध्ये अपघात होतात. बऱ्याचशा कंपनी योग्य प्रशिक्षण व सुरक्षा साधने पुरवतात; पण यंत्रसामग्रीच्या चुकीच्या हाताळणीमुळे अनेक अपघात होताना यापूर्वीच्या काही घटनांमधून दिसून आले आहे. भोसरी, पिंपरी, चिंचवड एमआयडीसी क्षेत्रात हाताची बोटे तुटणे, पाय तुटणे, डोक्याला गंभीर इजा याविषयी होण्याचे प्रकार घडत आहेत. ज्या कामगारांना ईएसआय योजना लागू आहे. त्याच्यासाठी ईएसआय दवाखाने असून, औषध उपचार सोय आहे. इएसआय योजनाही व्यवस्थित राबवली जात नसल्याने ब-याचशा कामगारांना इएसआय सुविधा असूनही त्याचा योग्य लाभ मिळत नाही. यामुळे अपघात होऊ नये यासाठी सुरक्षित उपकरणे हाताळणे हे एकमेव उपाय आहे. कामगारांना कंपनीकडून सर्व सुरक्षेच्या साधनांचा पुरवठा होणे गरजेचे असून त्याचा योग्य वापरही होणे गरजेचे आहे. भोसरी एमआयडीसीमध्ये रासायनिक, ज्वालाग्राही,रबर, प्लॅस्टिक, अवजड स्वरूपाच्या अनेक कंपन्यात अनेक कामगार कुठल्याही सुरक्षिततेच्या साधनांशिवाय काम करतात. या कामगारांना मास्क, हेल्मेट, गमबुट, गॉगल, हातमोजे, सेफ्टीबेल्ट, सुरक्षा पोशाख अशी सुरक्षेसंबंधातील साधने पुरवणे बंधनकारक आहे. परंतु अनेक कामगार या साधनांशिवाय काम करताना दिसून येतात. त्यामुळेच जीवघेणे अपघात होऊन कामगारांचा जीव जाऊ शकतो.(वार्ताहर)
कामगार सुरक्षा रामभरोसे
By admin | Published: January 25, 2017 1:58 AM