जगताप, काटे अन् कलाटे एकेकाळी होते अजित पवारांचे समर्थक; वेगळ्या वाटा, आता पुढे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 03:10 PM2023-02-12T15:10:15+5:302023-02-12T15:10:56+5:30
पोटनिवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची, संभ्रमात कार्यकर्ते व पदाधिकारी
हनुमंत पाटील
पिंपरी : गेल्या २० वर्षांपासून अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड असे एक राजकीय समीकरण झाले आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणात असलेले तीनही उमेदवार एकेकाळी पवार यांचे समर्थक होते. सर्वांचा नेता एकच असला तरी तिन्ही निवडणुकीत त्यांनी वेगवेगळ्या वाटेवर जाण्याचे आदेश समर्थकांना मिळाले. आता २०२३ च्या पोटनिवडणुकीत त्याचे समर्थक व कार्यकर्त्यांना पुढे काय, असा प्रश्न पडला आहे.
राज्यातील विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना २००९ साली झाली. त्यानंतर शहरात चिंचवड हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही विधानसभा निवडणुका लक्ष्मण जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे यांनी लढविल्या. हे तिन्ही उमेदवार एकेकाळी अजित पवार यांचे समर्थक होते. आता आमदार जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत तेच समर्थक पुन्हा एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत ;मात्र प्रत्येक निवडणुकीत अजित पवार यांचे समर्थक व कार्यकर्ते वेगळी भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे या पोटनिवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची, असा संभ्रम कार्यकर्ते व समर्थकांमध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
२००९ : लक्ष्मण जगताप यांना समर्थन...
चिंचवड विधानसभेची स्थापना २००९ साली झाली. या काळात राज्यातील सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि विरोधात शिवसेना-भाजपची युती होती. यावेळी काँग्रेस आघाडीची अधिकृत उमेदवारी भाऊसाहेब भोईर आणि युतीतून शिवसेनेची उमेदवारी श्रीरंग बारणे यांना मिळाली. यावेळी आघाडीत बंडखोरी होऊन लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष अर्ज भरला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समर्थकांनी बंडखोरी केलेल्या जगताप यांना समर्थन दिले. निवडून आल्यानंतर जगताप यांनीही त्याची परतफेड म्हणून राष्ट्रवादीला सहयोगी आमदार म्हणून पाठिंबा दिला.
२०१४ : नाना काटे यांना समर्थन
चिंचवडच्या २०१४च्या निवडणुकीत अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी पुन्हा बंडखोरी करून भाजपची वाट धरली. यावेळी आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी, तसेच युतीतील शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले. यावेळी भाजपकडून लक्ष्मण जगताप, शिवसेनेकडून राहुल कलाटे, कॉंग्रेसकडून कैलास कदम यांना उमेदवारी मिळाली. यावेळी अजित पवार यांनी समर्थकांना राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्यासोबत जाण्याचे आदेश दिले. मात्र, यावेळी काही समर्थक नाना काटे आणि काही समर्थक जगताप यांच्यासोबत गेले. त्यामुळे निवडणुकीत पुन्हा जगताप निवडून आले.
२०१९ : राहुल कलाटे यांना समर्थन...
२०१९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीने तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली. या वेळी राष्ट्रवादीने माघार घेत युतीकडून बंडखोरी केलेले राहुल कलाटे यांना अजित पवार यांच्या आदेशानुसार समर्थन व पाठिंबा दिला. त्यामुळे जगताप व कलाटे यांची निवडणूक चुरशीची झाली. कलाटे यांना अपक्ष म्हणून मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचविण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला होता.
चिंचवड विधानसभा निकाल
२००९ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप - अपक्ष - ७८ हजार ७४१
२) श्रीरंग बारणे - शिवसेना - ७२ हजार १६६
३) भाऊसाहेब भोईर - कॉंग्रेस - २४ हजार ६८४
२०१४ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप - भाजप - १ लाख २३ हजार
२) राहुल कलाटे - शिवसेना - ६३ हजार ४८९
३) नाना काटे - राष्ट्रवादी - ४२ हजार ५५३
२०१९ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप - भाजप - १ लाख ५० हजार
२) राहुल कलाटे - अपक्ष - १ लाख १२ हजार