देहूगाव : श्रीक्षेत्र देहूगाव येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अंत्यविधीसाठी उपस्थिती असलेल्या नातेवाइक व ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत रविवारी लोकमतमध्ये ‘स्मशानातही मरणयातना’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून तातडीने स्मशानभूमीतील जागा समतल करून त्याचे सपाटीकरण करवून घेतले. त्याचप्रमाणे स्मशानभूमीत पडलेला राडारोडाही हटविण्यात आला. येथील स्मशानभूमीत देहूगावसह, विठ्ठलनगर, माळीनगर, झेंडेमळा, चिंचोली यासह देहूरोड या भागातील अंत्यविधी येथे होत असतात. तसेच, अंत्यविधीसाठी या ठिकाणी लोखंडी जाळी बसवावी, जेणेकरून दहन करताना कोणतीही समस्या निर्माण होणार नाही, अशीही अपेक्षा ग्रामस्थांनी लोकमत प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे. (वार्ताहर)समस्यांना जावे लागत होते सामोरेस्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात होती. दरम्यान, लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच येथील राडारोडा हटविण्यात आला असून, जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. स्मशानभूमीतील या कामाची तातडीने दखल घेतल्याने ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
जमिनीचे सपाटीकरण; राडारोडा हटविला
By admin | Published: November 07, 2016 1:05 AM