पिंपरी: विनाकारण घराबाहेर पडून मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. विनामास्क फिरणाऱ्या अशा ३६१ नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. विकेंड लाॅकडाऊन असतानाही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे यावरून दिसून येते.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज दोन हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. दररोज शेकडो नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तरीही बेशिस्त नागरिक नियमांचे पालन न करताना दिसून येत आहेत.
एमआयडीसी भोसरी (३७), भोसरी (१२), पिंपरी (२५), चिंचवड (६९), निगडी (१६), आळंदी (२१), चाकण (२७), दिघी (०३), सांगवी (१०), वाकड (१२), हिंजवडी (३६), देहूरोड (२५), तळेगाव दाभाडे (१६), तळेगाव एमआयडीसी (०४), चिखली (१४), रावेत चौकी (१२), शिरगाव चौकी (१९), म्हाळुंगे चौकी (०३) या पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.