हिंजवडी : देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून अगदी केंद्र सरकारपासून ते ग्रामपंचायतपर्यंत विविध योजना राबवल्या जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र मुलांना शिक्षण घेण्यासाठी शिक्षण देणारे शिक्षकच उपलब्ध नसतील तर मुले शिकणार तरी कशी? असाच काहीसा प्रकार आयटीनगरीतील माण येथील जिल्हा परिषद शाळेत पाहायला मिळत आहे. शासन नियमाप्रमाणे या शाळेत तब्बल १० शिक्षकांची कमतरता आहे. मागील तीन वर्षांपासून मुख्याध्यापकपदही रिक्त आहे.शिक्षण विभागाच्या नियमावलीनुसार सर्वसाधारणपणे ३० ते ३५ विद्यार्थ्यांसाठी एका शिक्षकाची नेमणूक केली जाते. माणमधील जिल्हा परिषद शाळेत सध्या पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी पटसंख्या १२५४ आहे. सध्या २८ शिक्षक या ठिकाणी रुजू आहेत. अनेक वर्षांपासून १० जागा रिक्त आहेत. शाळेकडून, केंद्रप्रमुखांकडून अनेक वेळा शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून चालढकल सुरू असल्याने पुरेशा शिक्षकांशिवाय मुले कशी शिकणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाळेची जबाबदारी ज्याच्यावर असते ते मुख्याध्यापक पदही गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असल्याने जिल्हा परिषद शाळांबाबत शिक्षण विभाग उदासीन असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.माण येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या पहिली ते आठवीपर्यंत वर्ग भरतात. आजुबाजूच्या वाड्या-वस्त्यांमधून मोठ्या संख्येने मुले, मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. सध्या रुजू असलेले शिक्षक मुलांना शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राचेही शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या यशवंत कला-क्रीडा महोत्सवामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर यश संपादन केले आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी शाळेचा नावलौकिक वाढवत आहेत, तर दुसरीकडे शिक्षण विभाग मुख्याध्यापक व शिक्षकांची कमतरता ठेवत शाळेला अडचणीत आणत आहेत.मुख्याध्यापकाची नियुक्ती करून शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी माण येथील ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे.आयटी कंपन्यांकडून शाळेला मदतआयटीनगरीचा बहुसंख्य भाग माण हद्दीत येतो. परिसरातील आयटी कंपन्यांकडून जिल्हा परिषद शाळेला आजपर्यंत भरघोस मदत मिळाली आहे. शाळेची भव्य इमारत, स्वतंत्र लॅब, संगणक, वाचनालय, पुस्तके, बाकडे, तसेच स्वखर्चातून दर शनिवार, रविवार विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन अशा प्रकारची मदत शाळेला होत आहे. ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद शाळेला वेळोवेळी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येते. त्यामुळे एकीकडे मदतीचा हात देऊन देशाची भावी पिढी सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे रिक्त असलेली मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे भरण्यास शिक्षण विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.वरिष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापकपदाचा भारआॅक्टोबर २०१५ मध्ये मुख्याध्यापक अशोक गायकवाड निवृत्त झाले. तेव्हापासून मुख्याध्यापक पद रिक्त आहे. शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्यामकांत धामणे हे मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पहिली ते आठवीपर्यंतचे १२५४ विद्यार्थी आहेत. सध्या कार्यरत २८ शिक्षक आहेत. शिक्षकांच्या एकूण १० जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तीन वर्षांपासून मुख्याध्यापकाविना भरतेय जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, शिक्षण विभागाची उदासीनता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:56 AM