पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र, श्रेयवादाच्या राजकारणात विविध विकास प्रकल्प तयार होऊनही केवळ नेत्यांना वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाअभावी प्रकल्पांचा लाभ शहरवासीयांना मिळालेला नाही, विकासकामांचे राजकारण थांबवून नाट्यगृहाचा पडदा उघडावा आणि तहानलेल्या शहराला पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे. चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत तळ ठोकून असणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शहरवासीयांसाठी कधी वेळ मिळणार? अस प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय राजवट आहे. येथील कारभारावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. प्रशाकीय वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात पहिल्या पाच महिन्यांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना, तर त्यानंतर आठ महिन्यांत महायुतींच्या नेत्यांना अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने प्रकल्प अद्यापपर्यंत सुरू झालेले नाहीत.
चिंचवड विधानसभा निवडणूक झाली...
महिन्याभरापूर्वी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री तसेच खासदार, केंद्रीय मंत्री, आमदार या ठिकाणी तळ ठोकून होते. चिंचवड विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, महापालिकेच्या वतीने पूर्ण केलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनास वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
हे प्रकल्प आहेत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
महापालिकेच्या वतीने विविध प्रकल्प तयार आहेत. मात्र, शहरातील अनेक विकासकामे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. पिण्याचे पाणी आणि नाट्यगृह रखडले आहे.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचा पडदा कधी उघडणार
शहरातील सर्वाधिक स्मार्ट परिसर समजला जाणाऱ्या प्राधिकरणामध्ये साहित्यसम्राट ग. दि. माडगूळकर नाट्यगृह महापालिकेच्या वतीने उभारलेले आहेत. या प्रकल्पाचे काम गेल्या आठ वर्षांपासून सुरू होते. प्रशासकीय राजवट सुरू होण्याच्या अगोदर या नाट्यगृहाचे काम पूर्ण झालेले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, शिवसेनेचा एक आणि भाजपचे दोन असे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे श्रेयवादामध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन नक्की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करायचे की महायुतीच्या नेत्यांनी करायचे यात उद्घाटन रखडले. गेल्या वर्षभरापासून नाट्यगृहाचा पडदा उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे.