पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) लोकांसारखी चिकाटी हवी. मतदारांशी थेट संपर्क कसा करायचा ते त्यांच्याकडून शिका. विधानसभेसाठी आतापासूनच मतदारांच्या घरी पोहचा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला.विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी खा.पवार यांनी पक्षाच्या विभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी त्यांनी पुण्यातील भोसरीत पदाधिकाºयांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरएसएस’चे सदस्य कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले अन् एक घर बंद असेल, तर ते संध्याकाळी पुन्हा जातात. संध्याकाळी घर बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. मतदारांच्या संपर्कात कसं राहावं हे ‘आरएसएस’ कडून शिकले पाहिजे. विधानसभेसाठी लोकसभेप्रमाणे मतदान होत नाही. स्थानिक पातळीवरील प्रश्न, उमेदवार कोण, त्याची काम करण्याची पद्धत, जनतेमध्ये असलेला विश्वास या बाबींवर मतदान होते. राष्ट्रवादीत आता नवीन चेहरे व तरुणांना संधी देण्यात येणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
चूक झाल्यानेच जनतेने नाकारलेपिंपरी-चिंचवडच्या जनतेने महापालिका आणि मावळ लोकसभेत आपल्याला नाकारले, तेव्हा त्यांचे चुकले असे मानणे योग्य नाही. आपल्याकडून काहीतरी चूक झाली असावी, हे लक्षात घ्या. झालेली चूक दुरुस्त करा, आपली भूमिका लोकांसमोर मांडा. महापालिकेत राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक असतानाही पालिकेतील चुकीच्या कारभारावर अपेक्षित आवाज उठविला जात नाही, असे खडे बोलही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.