लोकमत न्यूज नेटवर्कथेरगाव : पादचा-याला रस्त्यावरचा राजा समजले जाते. चालणा-या व्यक्तीला प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र हा राजा रोजच जीव मुठीत धरून रस्ता ओलांडताना दिसत आहे. कारण शहरातील बहुतांश चौकातील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. थेरगाव येथील डांगे चौकामध्ये सिग्नलवर पादचा-यांची कुचंबणा होताना दिसत आहे. सिग्नलवरील झेब्रा पट्टे झाले गायब झाल्यामुळे वाहनचालक वाहने झेब्रा क्रॉसिंगवर थांबवत आहेत. त्यामुळे पादचा-यांनी चालायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, काही काळाने परिस्थिती ‘जैसे थे’ होते. डांगे चौकामधील सिग्नलवर एका बाजूला झेब्रा लाइन पुसट झालेली आहे, तर दुस-या एका बाजूला झेब्रा लाईनच दिसत नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे वाहने सर्रास झेब्रा लाईनच्या पुढे येऊन थांबतात. त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दर तीन महिन्यांनी रंगवायला हवेत म्हणजे या ठिकाणी झेब्रा लाईन स्पष्ट दिसेल आणि वाहने त्या लाईनच्या मागे थांबतील. मात्र, तसे होताना दिसत नाही. मोबाइलवर बोलणे ठरतेय धोकादायकपिंपरी : मोबाइलमुळे संपर्क क्रांतीचे दिवस आले असले, तरी मोबाइलचा वापर भर वर्दळीच्या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकीस्वार करीत असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, अशा ‘संपर्क अतिरेकी’ वाहनचालकांमुळे प्रवाही वाहतुकीला अडथळे येत असून, संपूर्ण लक्ष वाहन चालविण्यावर ठेवण्याऐवजी संपर्कामध्ये असलेल्या अशा वाहनचालकांमुळे गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांपर्यंत मोबाइलची सवय आता मर्यादित राहिलेली नाही. आता दुचाकी, चारचाकी चालविता चालविता व्हॉट्सअॅपचे मेसेज वाचणारेही आता आढळू लागले आहेत. बोलण्याच्या, चॅटिंग करण्याच्या नादात आपला वाहतुकीला काही अडथळा होत असेल, हे अशा वाहनचालकांच्या गावीही नाही. मोबाइल हा शरीराचा एक अवयवच असल्याची स्थिती सार्वजनिक ठिकाणांवरून फिरत असताना दिसते. दुचाकीस्वार मोबाइल कान आणि खांद्यामध्ये धरून तिरकी मान करीत बराच वेळ बोलण्यात गर्क असतात. त्या वेळी वाहन चालविण्यात संपूर्ण लक्ष नसल्याने दुचाकी वेडीवाकडी होत असते. मागून जाणाऱ्या वाहनचालकांना अशा दुचाकीस्वाराचा अडथळा आल्याने ते जोरजोराने हॉर्न वाजवित असल्याचे दिसून येते. चारचाकीचालकही एका कानाशी मोबाइल धरून बोलत वाहन चालवीत असल्याने त्यांच्या वाहनाचा वेग मंदावतो. एक नजर मागून येणाऱ्या वाहतुकीवर, लक्ष समोरच्या वाहतुकीवर आणि कान संभाषणात अशी तिहेरी अवस्था असलेल्या या अवजड वाहनाचा मोठा त्रास अन्य वाहनचालकांना होताना दिसतो. सबंध रस्त्यावर पोलिसांचे अस्तित्व क्वचित एखाद्या चौकात असल्याने ‘संपर्क अतिरेकी’ बेदरकारपणे मोबाइलवर बोलत किंवा चॅटिंग करत जाताना दिसत आहेत. चारचाकीस्वारांचे मोबाइल दिसून येत नसल्याने त्यांच्यावर पोलिसांचेही लक्ष जात नाही.
झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच झाले गायब
By admin | Published: June 12, 2017 1:33 AM