पिंपरी : महापालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ‘चले जाव भाजपा’ हे आंदोलन आज करण्यात आले. राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी पिंपरी महापालिकेसमोर राडा केल्याचे चित्र दिसून आले. यावेळी ‘‘निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला उलथवून टाकू, अशी टीका यावेळी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीत बदल केले आहेत. त्यानंतर पहिला महामोर्चा काढण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने चले जाव भाजपा हे आंदोलन केले.
चिंचवड स्टेशन येथून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, भ्रष्टाचारी सत्ताधारी चले जाव, आदी घोषणा देण्यात आल्या.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले, ‘‘हा मोर्चा महापालिकेतील भ्रष्टाचारावर हल्लाबोल आहे. महापालिकेतील भ्रष्ट सत्ता घालवण्यात येईल. सत्ताधारी भाजपाने इंद्रायणी नदीत सुधार प्रकल्पात घोटाळा केला, स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्वत:चे खिसे भरले, पाणी पुरवठा नियोजनात अपयश आले, कचऱ्याच्या प्रकल्पात घरातील लोकांना स्वत:च्या बगलबच्चना ठेका देऊन पैसे लाटले, चुकीचा वाढीव खर्च दाखवून निवडणुकांचा फंड गोळा केला, विद्यार्थ्यांच्या गुडफिल किट मध्ये देखील पैसे खाल्ले अशा एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत.’’
अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. पाच वर्षांपूर्वी शहरास दिलेली आश्वासने पूर्ण होऊ शकली नाहीत. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्याचा पोलखोल राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. चुकीच्या कामांना आता थारा दिला जाणार नाही.’’