पिंपरी - सांगवी येथे संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी (13 मे) ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे संरक्षण विभागाच्या हद्दीतील सर्व कर्मचारी आणि रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन संरक्षण विभागाच्या संरक्षण विभागाच्या सीक्यूएईतर्फे करण्यात आले आहे. सीक्यूएईने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या संरक्षण विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तसेच सांगवी आणि औंध भागात मुळा नदी आहे. या नदीच्या दुतर्फाही झाडे आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत नागरिक येथे फिरण्यासाठी येतात. याच भागात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना या भागात प्रवेश बंदी केली आहे.
काही दिवसांपूर्वी आयटी नगरी हिंजवडी परिसरात असलेल्या कासारसाई येथे बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट होती. सांगवीतील सीक्यूएईचा हा परिसरही आयटी नगरी हिंजवडी लगत आहे. आयटी नगरीतील कर्मचारी सांगली आणि परिसरात वास्तव्यास आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा मध्यवर्ती भाग म्हणून सांगवी परिसर ओळखला जातो. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.