पिंपरी : चिखली -मोशी परिसरामध्ये आज पहाटेपासून बिबट्या आलेला आहे. त्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे. बिबट्याचा शोध वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत. तर बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.
मावळ परिसराशी लगत असणाऱ्या पिंपरी चिंचवड नदीकाठच्या परिसरामध्ये बिबट्या येत असतो. इंद्रायणी नदीच्या काठावर अनेक वेळा बिबट्यांचे दर्शन झालेले आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास चिखली आळंदी रस्त्यावरील आशियाना बेकरी जवळ बिबट्याचे दर्शन झाले. आणि याबाबतचा मेसेज विविध सोसायटी यांच्या ग्रुप वर तसेच सोशल मीडियावर फिरला त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच तासांपासून बिबट्या या परिसरामध्ये विविध भागांमध्ये फिरत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे.
मॉर्निंग वॉकवरही झाला परिणाम
मोशी चिखली परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठालगत मोठ्या प्रमाणावर उपनगर वसले आहे. या भागात मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायटी निर्माण झालेले आहेत. त्या ठिकाणी हिवाळ्याचे दिवस असल्याने मॉर्निंग वॉकसाठी नागरिक घराबाहेर पडत असतात. मात्र, आज सकाळी सोसायट्यांच्या ग्रुप वर बिबट्या आल्याचा मेसेज पडल्याने अनेकांनी मॉर्निंग व टाळले.