पिंपरी चिंचवड: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडविधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी अर्ज कायम ठेवले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही काटे बंडखोरीवर ठाम आहे. अजित दादांचा फोन आल्यावर चर्चा करू अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
काटे म्हणाले, चिंचवड विधानसभेत मतदारांच्या आम्ही गाठी भेटी घेत आहोत. त्यांची इच्छा आहे की मी निवडणूक लढवावी. अजितदादांच्या ऑफिसमधून आज सकाळी फोन आला होता. ते दुपारी ३ वाजण्याच्या आत पुन्हा मला फोन करणार आहेत. दादांचा फोन आल्यावर त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
काटेंनी बंडखोरी कायम ठेवून नाना काटेंनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडी की महायुतीला बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने दोन्ही मतांचं गणित आता बदलण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत कलाटे यांच्या बंडखोरीने भाजपाला फायदा झाला होता. आता नाना काटे अजित पवार गट म्हणजेच महायुतीत आहेत. काटेंनी बंडखोरी केल्याने आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. परंतु भाजपची मतं त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे. पक्षफुटीने राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता वाढली आहे. भाजपची मतं सध्यातरी सुरक्षित असल्याने आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.