पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रावेत उपकेंद्रात बिघाड झाल्याने शहरातील आज दिवसभरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आज २६ जुलै रोजी दिवसभरात होणारा पाणीपुरवठा नेहमीपेक्षा उशिरा, कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होणार आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
अतिदृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील धरण आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची गढूळता जास्त प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रावेत पंपिंग हाऊस येथील पंपिंग यंत्रणेत तांत्रिक बिघाड निर्माण झाला असल्याने त्या अनुषंगाने दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे आज दिवसभरात होणारा पाणीपुरवठा नेहमीपेक्षा उशिरा, कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होणार आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. तरी दक्षतेची खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.