लोकमत न्यूज नेटवर्कबोपखेल : बोपखेलमधील गणेशनगर भागात सतत विजेचा लपंडाव सुरू असतो. एकदा वीज गेल्यास दोन ते तीन तासांनीच वीज येत असून, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बोपखेल विभागाला दापोडी महावितरण कार्यालय आहे. या कार्यालयात वारंवार फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही महावितरण कर्मचारी फोन उचलत नाहीत. जर उचलला, तर दहा मिनिटांत वीज येईल, असे उत्तर मिळते. मात्र एक एक तास वीज येत नाही.असाच प्रकार शनिवारी दुपारी तीन वाजता घडला आहे. दुपारी तीनला वीज गेली. नागरिकांनी दापोडी कार्यालयात तक्रार करूनही वीज आली नाही. तब्बल पाच तास वीज आली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही फोन लावले; मात्र तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याचा त्रास होत आहे. लॉण्ड्री सेंटर, फोटो स्टुडिओ अशा अनेक व्यावसायिकांनासुद्धा याचा त्रास होत आहे. गेले कित्येक दिवस झाले हा असा विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना मात्र नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे काहीही देणे उरले नसल्याचे दिसून येत आहे. गणेशनगर भागात सतत वीज जात राहते. महावितरणला फोन करून काहीच उपयोग होत नाही.आता लग्नसराई असल्यामुळे बरेच लोक कपडे इस्त्रीसाठी टाकतात; मात्र वीज नसल्यामुळे मला वेळेवर कपडे देता येत नाही. त्यामुळे लॉण्ड्री व्यवसायावर परिणाम होत आहे, असे लॉण्ड्री व्यावसायिकांनी सांगितले.
बोपखेलमध्ये विजेचा लपंडाव
By admin | Published: May 15, 2017 6:39 AM