आकुर्डी : येथील म्हाळसाकांत चौकातून निगडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकावर लावलेले पथदिवे झाडांच्या फांद्यामुळे झाकोळले आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर येत नाही. परिणामी या परिसरात पथदिवे असूनही नेहमी अंधार असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सायंकाळी सातनंतर पथदिवे सुरू केले जातात. पण झाडांच्या फांद्या इतक्या वाढल्या आहेत, की हे पथदिवे पूर्ण झाकून गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अंधार असतो. रस्ता ओलांडणारा पादचारीही अंधारामुळे दिसत नाही. वाहनचालकांना कसरत करीतच वाहन चालवावे लागते. स्टॉर्म वॉटरची लाईन एका खासगी रुग्णालयापासून येथील गणेश मंदिरापर्यंत आहे. ड्रेनेजवर जाळ्या बसविल्या आहेत. वाहनांमुळे जाळ्या दबून खड्डे पडले आहेत. अंधारामुळे त्याचाही अंदाज येत नाही. जेवल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी नागरिकांची या रस्त्यावर रात्री गर्दी असते. मोकाट कुत्री, गाई रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. अंधारामुळे त्यांना वाहनाची धडक बसण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. छोटे मोठे अपघात होऊन वाद होतात. पथदिव्यांना अडसर ठरणाºया झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांतून होत आहे.