लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भटक्या समाजाचे जीवन व गावगाडा साहित्यातून समाजपटलावर आणत रामनाथ चव्हाण यांनी या बिनचेहऱ्याच्या माणसांना घराच्या चेहऱ्यात पोहोचविण्याचे कार्य केल्याची भावना ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड साहित्य कलाप्रेमी मंच, सोहम लायब्ररी व नालंदा वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण यांच्या निधनानिमित्ताने आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव समीर चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, स्वराज अभियानाचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, गोरक्ष लोखंडे, लता ओव्हाळ, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, प्रताप गुरव, साहित्यिक श्रीकांत चौगुले, सुहास घुमरे, पंचशील संघाचे आर.जी. गायकवाड उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘भटक्या विमुक्त समाजावर लिहिलेले त्यांचे पाच खंड मराठी साहित्यात चिरस्थायी असणार आहेत. वेदनेच्या वाटेवरून सुरू केलेल्या या समाजाचा प्रवासही सकलभूमी संस्कारित करणार आहे.’’ या प्रसंगी समीर चव्हाण यांनी वडिलांविषयीच्या समाजातील लोकांच्या भावना ऐकून ऊर भरून आल्याचे म्हटले. सोहम लायब्ररीचे जगन्नाथ नेरकर यांनी कार्यक्रम करण्यामागची भावना विशद केली, तर नालंदा वाचनालयाचे विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
भटक्या समाजाचे जीवन साहित्यात
By admin | Published: May 09, 2017 3:41 AM