शब्दांना देवरूप प्राप्त करून देणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि मराठीचे बोल कौतुकाने बोलायला लावणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांचा चरणस्पर्श लाभलेल्या पिंपरी-चिंचवड या भूमीत ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. वैभवीपणाची साक्ष देणाऱ्या या संमेलनातील वादही वैभवीच होतात की काय याची नांदी, संमेलनाध्यक्षांच्या भाषणावरून दिसून येत आहे. सामाजिक जीवनात भाष्य करताना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासारख्या सुज्ञ समीक्षकाने साहित्य उपासकाने बेभान नव्हे, तर भान ठेवून मत व्यक्त करायला हवे, अशी अपेक्षा समाजातील विविध स्तरांतून होत आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील यांच्या सहकार्याने माऊली-तुकोबा आणि गणेशभक्त मोरया गोसावींच्या भूमीत साहित्य संमेलन होत आहे. वाद नाही तर साहित्य संमेलन कसले, या परंपरेला हे वर्षही अपवाद नाही. हे संमेलन संतांच्या दिव्य परंपरेला साजेसे होत असतानाच संमेलनाध्यक्षांनी असहिष्णू वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. वास्तविक सबनीस यांच्यासारख्या समीक्षक, भावनिक लेखकाकडून ही गोष्ट अपेक्षित नाही. यंदा कसलाही वाद नाही, असे संयोजक आपल्या पत्रकार परिषदांमधून वारंवार सांगत असतानाच त्यास छेद देण्याचे काम संमेलनाध्यक्षांनी केले आहे. आकुर्डीच्या विद्यार्थी साहित्य संमेलनात डॉ. सबनीस यांनी केलेले भाषण हे वेगवेगळे वाद उकरून काढणारे तर होतेच, त्याचबरोबर अभिजन आणि बहुजनांना संवादातून कसे जोडू शकतो. इतिहासाचा कसा विनयभंग सुरू आहे. भाषा शुद्धतेच्या नावाखाली अभिजन कसा डांगोरा पिटताहेत, याचे भान देणारा होता. मात्र, बोलण्याच्या अतिउत्साहात सबनीसांची सटकली की काय, याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला. त्यांनी ब्राह्मणाचे सोवळे सोडून मराठीला जानवेमुक्त करा. ‘भिकारचोट संस्कृती’ येथपासून, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेला एकेरी उल्लेख आणि पाडगावकरांपूर्वी श्रद्धांजली वाहावी लागली असती, असे बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेतला. ‘बहारो फुल बरसाओ’, ‘हम तुम एक कमरे में’ ही चित्रपट गीतेही ऐकवली. त्यामुळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘हे काय बोलताहेत’ असा प्रश्न पडला. भावनेच्या भरात हे स्वाभाविक आहे. बोलण्याच्या ओघात सबनीस बोलले असावेत. मात्र, त्यांनी वापरलेली भाषा, एकेरी उल्लेख नक्कीच समर्थनीय नाही. प्रसिद्धीसाठी असे बोलणे योग्य नव्हे. पंतप्रधान हे समन्वय संवादाच्या माध्यमातून ‘दहशतवाद’ कसा संपवू शकतो याचे उदाहरण सांगताना आणि पंतप्रधानांच्या अतीव काळजीपोटी संमेलनाध्यक्ष बोलले असावेत. त्यातून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यापेक्षा आणखी भाष्य करून वादाला आणखी हवा देतात की काय असे चित्र सध्या तरी दिसत आहे.सबनीसांनी माफी मागितली नाही, तर संमेलनात पाय ठेवू देणार नाही असा इशारा खासदार अमर साबळे यांनी, तर वेळप्रसंगी संमेलन उधळून लावू, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यामुळे संमेलनाचे काय होणार, याची चिंता संयोजकांना लागली आहे.
साहित्य उपासकांनी बेभान नव्हे; ‘भान’ ठेवण्याची गरज
By admin | Published: January 04, 2016 12:54 AM