पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासन विभागातील सहायक आयुक्तांच्या बदलीची चर्चा रंगली आहे. ते काम करत असलेला प्रशासन विभाग मिळावा, यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी काहींनी आमदार, खासदारांची शिफारस पत्रे आणली आहेत. तर काहींनी थेट मंत्रालयात जात मंत्र्यांना साकडे घातले असल्याची चर्चा सुरू आहे.
महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची मुदतपूर्व तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही मुदतपूर्व बदली झाली. दरम्यान, नवीन अतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्तीचे नाट्य महापालिकेत घडले. त्याचवेळी प्रशासन विभागातील सहायक आयुक्तही बदली करून घेत असल्याची चर्चा रंगली. महापालिकेतील प्रशासन विभाग महत्त्वाचा मानला जातो. त्या विभागामध्ये नियुक्ती व्हावी, यासाठी महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
महापालिका आस्थापनेवरील तीन सहायक आयुक्त तर, प्रतिनियुक्तीवरील २ सहायक आयुक्त त्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी काही अधिकाऱ्यांनी खासदार व आमदारांचे शिफारस पत्र आयुक्तांकडे सादर केले आहेत. तर त्यामधील एका अधिकाऱ्याने थेट मंत्रालयातून खुर्चीपर्यंतचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याबाबत महापालिका वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
दरम्यान, प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांची बदली तांत्रिक कारणांमुळे रद्द झाली आहे. त्यामुळे प्रयत्न करणारे अधिकारी हिरमुसले आहेत. मात्र, त्यांनी आपले प्रयत्न कायम ठेवले असून, नेतेमंडळीकडे उठबस व संपर्क कायम ठेवला आहे.
नोकरभरतीसाठीही शिफारस पत्रांची रीघ
राज्य शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अत्यावश्यक विभागांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात विविध पदांसाठी भरती केली जात आहे. त्यामध्ये इच्छुक पदासाठी आमदारांसह खासदारांचे शिफारस पत्र घेऊन येत आहे. मोठ्या संख्येने येत असलेल्या त्यांच्या या शिफारस पत्रामुळे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी गोंधळात पडले आहेत. नोकरभरती प्रक्रिया त्रयस्थ संस्थेमार्फत होणार आहे.