महापालिका निवडणुकीत महायुतीचा निर्णय स्थानिक नेते घेणार- अजित पवार
By विश्वास मोरे | Published: August 26, 2023 01:30 PM2023-08-26T13:30:14+5:302023-08-26T14:29:36+5:30
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वबळावर याचा निर्णय स्थानिक नेते घेतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केली...
पिंपरी : भाजपसोबत गेल्याने टीका होत आहे. मात्र, मी लोकांची कामे करण्यासाठी सोबत गेलो आहे. विचारधारा सोडलेली नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीत एकत्रित लढविल्या जातील. मात्र, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वबळावर याचा निर्णय स्थानिक नेते घेतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महिन्याभरापूर्वी उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर पवार यांनी प्रथमच येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. व्यासपीठावर शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे-पाटील, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, कविता आल्हाट, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, श्याम लांडे, सतीश दरेकर उपस्थित होते.
निगडीपर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न
पवार म्हणाले, मेट्रोचा निगडीपर्यंत विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी दिल्याचे जाहीर केले आहे. निगडी ते कात्रजपर्यंत मेट्रोच्या विस्ताराची गरज आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी, रेडझोन, साडेबारा टक्के परतावा जमीन, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, मुबलक पाणीपुरवठा, नदी सुधार योजना या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल.
मोदींचे कौतुक, शरद पवारांचा अनुल्लेख
पवार यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले. संपूर्ण जगात मोदी यांच्यासारखा लोकप्रिय नेता नाही, असा उल्लेख केला. मात्र, पाऊण तासाच्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी त्यांनी शब्दही काढला नाही.
न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक
अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केव्हाही पालिकेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.
प्रेम आहे, पण...
पिंपरी-चिंचवडवरील प्रेम व्यक्त करताना पवार यांनी मुलांच्या पराभवाचा थेट उल्लेख केला नाही. पवार म्हणाले, बारामतीएवढेच मी पिंपरी-चिंचवडवर प्रेम करतो. एखादा अपवाद वगळता, या शहराने माझ्यावर प्रेम केले आहे. कारण येथील माती, माणसे आपली वाटतात. त्यामुळे आगामी काळात येथील प्रलंबित आणि महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.