पिंपरी : गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीय आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झिरो टॉलरन्स प्रोग्राम राबविण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत देहूरोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जोयल भास्कर पलाणी (वय २१, रा. साईनगर, मामुर्डी) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. १९) स्थानबद्धतेचे आदेश दिले असून, त्यानुसार आरोपी पलाणी याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पलाणी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. मामुर्डी, साईनगर, देहुरोड भागात विविध गुन्हे करीत त्याने दहशत माजविली होती. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. तडीपार असतानाही आरोपी पलाणी देहूरोड हद्दीत येऊन तडीपार आदेशाचा भंग करीत होता. तडीपार असताना त्याने दोन गुन्हे केले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून देहूरोड पोलिसांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार आरोपी पलाणी याला स्थानबद्ध करण्यात आले.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, पीसीबी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, अनिल जगताप यांनी ही कारवाई केली.
सराईत गुन्हेगार जोयल पलाणी स्थानबद्ध; पोलीस आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 1:32 PM
येरवडा कारागृहात रवानगी
ठळक मुद्देमामुर्डी, साईनगर, देहुरोड भागात विविध गुन्हे करीत माजविली होती दहशत माजविली