विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. नात्या-गोत्यांचा, जातीपातीचा विचार करू नका. गंमत- जंमत करण्याचा प्रयत्न कुणी करेल, तर खपवून घेतलं जाणार नाही. मी तुमचा बंदोबस्त करेन. इमानेइतबारे काम करायचे आहे. मॅच फिक्सिंग-मिलीभगत चालणार नाही, असा सज्जड दम उपमुखमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पिंपरीत भरला. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील सभेत पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, "स्मार्ट सिटी, मेट्रोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला. मोदी हे विकासपुरुष आहेत. त्यांच्या धोरणामुळे आपली अर्थव्यवस्था चांगली झाली आहे त्यामुळे राज्य, देशाच्या विकासासाठी त्यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. रोजगार, गुंतवणूक, उद्योजकता वाढीसाठी मोदींचे हात बळकट करण्याची गरज आहे. संविधान बदलण्याचा होणारा आरोप चुकीचा आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये संविधान दिन साजरा होत नव्हता. मात्र, आता होत आहे."
"विरोधीपक्षाचे दाखवायचे दात आणि प्रत्यक्ष दात वेगळे आहेत. निवडणुका होणार नाहीत, संविधान संपवले जाईल, असा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे खोट्या- नाट्या प्रचाराला थारा देऊ नये. मी सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी महायुती बरोबर गेलो आहे. पुण्याचा रिंग रोड, मुळशीचे पाणी दोन्ही शहरांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे," असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
आणि खुलासा केला!
पिंपरीतील एका कार्यक्रमात बारणे यांचे प्रतिस्पर्धी माजी महापौर संजोग वाघेरे अजित पवार यांच्या पाया पडले होते. हे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यावर पवार म्हणाले, "आमदार अण्णा बनसोडे यांच्या कुटुंबातील लग्न होते. त्या सोहळ्यास मी उपस्थित होतो. त्यावेळी विरोधी पक्षातील उमेदवार तिथे आले आणि मला भेटले, त्यांचे फोटो व्हायरल केले. गैरसमज पसरविला. मी एक सांगतो, ज्यांनी आपला साथ सोडली, तो आपला नाही. त्यामुळे कोणीही गडबड गडबडून जाऊ नये."