पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असून मावळची जागा शिवसेना शिंदे गच्या वाट्यास गेली आहे. मावळमधून श्रीरंग बारणे यांना गुरुवारी सायंकाळी उमेदवारी जाहीर केली आहे. सलग तिसऱ्यांदा शिवसेनेने बारणे यांना उमेदवारी दिली आहे.
लोकसभेची आचार संहिता जाहीर झाल्यापासून मावळची जागा कोणास जाणार? याबाबत कमालीची उत्सुकता होती. तीन महिन्यापासून या जागेवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही दावा केला होता. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ कायम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात चर्चा सुरु होती. मात्र, ही जागा शिवसेनेलाच मिळणार? याबाबत शिंदे गटास सुरुवातीपासून खात्री होती.
महायुतीतील घडामोडीमुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला होता. गुरुवारी सायंकाळी शिवसेनेने उमेदवार जाहीर केले. त्यात बारणे यांची वर्णी लागली आहे. गेली दहा वर्ष बारणे मावळचे खासदार म्हणून काम करीत आहेत. उमेदवारी मिळाल्याने थेरगाव येथील बारणे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.