‘लोकमत’ चा अंदाज ठरला खरा..! पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत लागली ' यांची' वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:59 AM2019-02-22T11:59:36+5:302019-02-22T12:00:45+5:30
पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपच्या राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे, अपक्ष झामाबाई बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची आज निवड करण्यात आली. महापौर राहुल जाधव यांनी स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा केली. लोकमत ने स्थायील समितीत कोणाची वर्णी लागू शकते याचा अंदाज वर्तविला होता. तो अचूक ठरला.
पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य असतात. भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. यातील गतवर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वषार्चा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपणार आहे. त्यांच्या जागी या नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमतचे वृत खरे
रिक्त झालेल्या जागांवर भाजपच्या राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे, अपक्ष झामाबाई बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. एकनाथ पवार यांनी भाजपच्या, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीच्या, गटनेते राहुल कलाटे यांनी शिवसेनेच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिले. त्यानंतर संबंधितांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर जाधव यांनी केली.