पिंपरी : महापालिकेने दापोडी ते निगडी या मार्गावर बीआरटी बस सेवा सुरू करून आठवडा झाला आहे. आठवड्यानंतर बीआरटी मागार्तून अन्य वाहनेही मोठ्या जात आहेत. त्यामुळे बीआरटी सेवेत अडथळा निर्माण होत असल्याने बीआरटी मागार्तून बसश्विाय अन्य वाहनांना प्रवेश बंद घातली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत.
दहा वर्षांनंतर दापोडी-निगडी या बीआरटी मार्गाची सुरूवात ही आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रयत्नातून झाली. मागील आठवड्यात या मार्गाची सुरूवात झाली. दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावर बीआरटी बस व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन आणि पोलीस वाहने यांना प्रवेश देण्यात आला आहे. अन्य वाहने बीआरटी मागार्तून धावताना आढळल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,असे आयुक्त हर्डीकर यांनी माध्यमांना सांगितले होते. यासाठी महामार्गावर बीआरटी मार्गात जाणे आणि मार्गातून बाहेर येणे अशा इन आणि आऊटच्या ठिकाणी ट्राफीक वॉर्डनचीही नियुक्ती केली होती.
मात्र, ट्रॉफीक वॉर्डन असतानाही या मार्गातून मोठयाप्रमाणावर वाहने जात आहेत, याबाबतची पाहणी लोकमतने केली होती. बीआरटी मार्गातील त्या वाहनांवर कारवाई होणार कधी? असे वृत्त हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसिद्ध झाले होते. सर्रासपणे बीआरटी मार्गातून बस शिवाय अन्य वाहने जातात मात्र कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
सूचना आणि हरकती मागविल्याअपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी आदेश प्रसिद्ध केला आहे. रानडे म्हणाले, ‘‘बीआरटीसाठी अडथळा निर्माण होतो. त्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच बीआरटी मार्गात पार्किंग देखील करता येणार नाही. याबाबत यापूर्वी जर कोणते आदेश काढले असतील तर ते सर्व आदेश रद्द करण्यात येत आहेत. दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावर अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असतील तर नागरिकांनी आपल्या हरकती अथवा सूचना लेखी स्वरूपात १२ सप्टेंबरपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचना आणि हरकती यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.’’