वडगाव मावळ : मावळ तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, खिडक्या तुटल्या आहेत. याबाबतचे सचित्र वृत्त १३ आॅगस्टला ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन तहसीलदार निवासस्थानाचे काम सुरू झाले.
३ जुलै १९८७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी विनायक राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तत्कालीन तहसीलदार सचिन बारवकर यांनी २०१२ पर्यंत या इमारतीत वास्तव्य केले. त्यानंतर तहसीलदार देवदत्त ठोंबरे, शरद पाटील, जोगेंद्र कट्यारे, सध्या असलेले रणजित देसाई हे या निवासस्थानात राहिले नाहीत. कालांतराने पावसाळ्यात छत गळू लागले. खिडक्या, दरवाजे, संरक्षण भिंती व प्रवेशद्वार मोडकळीस आले. परिसरात साप, विंचू, उंदीर यांचा वावर सुरू झाला. याबाबत तहसीलदार रणजीत देसाई म्हणाले, की कामाला सुरुवात झाली आहे.प्रत्येक तहसीलदाराने निवासस्थानाच्या दुरुस्तीची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. त्यांनी चालढकल करत काही वर्षे घालवली. पण काम केले नाही याबाबत ‘लोकमत’मधून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर तहसीलदारांनी बांधकाम खात्याच्या अधिकाºयांना फैलावर घेतले आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. या कामासाठी १० लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती शाखा उपअभियंता आर. आर. सोनवणे यांनी दिली. मावळ तहसीलदार यांचे पद महत्त्वाचे असून, तालुक्यात काही प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ घटनास्थळी जावे लागते.