लोणावळा : आपल्या प्रेयसीचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमप्रकरण चालू असल्याच्या संशयातून तिचा खून करून औरंगाबाद येथून पसार होत लोणावळ्यात आलेल्या खूनी प्रियकराला लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करीत उल्लेखनीय अशी कामगिरी केली. भोला कुमार (वय 27, मूळ राहणार गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या खुनी प्रियकराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोला कुमार याचे मृत तरुणी इंदू बरखू राय (वय 22, रा. मुकुंद नगर, रामकाठी, औरंगाबाद) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. भोला कुमार हा या तरुणीच्या वडिलांच्यासोबत प्लंबिंगचे काम करीत होता. मागील दीड वर्षांपासून त्यांच्याच घरी राहण्यास होता. यादरम्यान त्याचे आणि इंदू हिचे सूत जुळले. मात्र इंदू हिच्या घरात हे समजल्यावर भोलाकुमार याला इतरत्र बाहेर राहण्यासाठी जावं असं इंदू हिचा मोठा भाऊ सुनील याने सांगितले. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नेहमीप्रमाणे इंदू ही कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. यावर तिच्या घरच्यांनी भोलाकुमार याच्याशी संपर्क साधला असता त्याने देखील त्यांच्यासोबत इंदूचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र उशिरापर्यंत तिचा काहीही तपास लागला नाही.
दुसऱ्या सकाळी इंदू हिच्या घरच्यांना समजलं की औरंगाबाद येथील राजनगर विभागातील एका मोकळ्या मैदानात एक युवती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. त्यांनी तेथे जाऊन बघितले असता ती इंदू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्यांनी भोलाकुमार याला फोन केला असता त्याचा फोन बंद लागत असल्याने त्यांना त्याचा संशय आला व त्यांनी औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
पोलिसांनी त्याचा माग काढला असता तो लोणावळ्यात पळून येत असल्याचे त्यांना समजले. त्या महितीच्या आधारे औरंगाबाद पोलिसांनी लोणावळा पोलिसांना माहिती दिली असता लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील आणि पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस नाईक अजीज मिस्त्री, पोलीस काॅन्स्टेबल हनुमंत शिंदे, स्वप्निल पाटील, मनोज मोरे, गणेश अकोलकर यांनी लोणावळ्यातील सेंटर पॉईंट याठिकाणी आपलं कौशल्य पणाला लावीत सापळा रचला आणि भोला कुमार याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपीला औरंगाबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.