लोणावळा : जागतिक पातळीवरील अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत पात्रता फेरीच्या क्वालिफिकेशन लाईन सरावाकरिता लोणावळा ते तिकोना दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या देश पातळीवरील टाटा अल्ट्रा ह्या 50 व 35 किलोमिटरच्या मॅरेथॉन (धावण्याच्या) स्पर्धेत किशोर गव्हाणे या स्पर्धकाने अवघ्या 3 तास 20 मिनिटे व 37 सेकंदात 50 किलोमिटरचे अंतर पुर्ण करत भारतातील सर्वात जलद अल्ट्रा धावपटू होण्याचा मान मिळविला.
मागील वर्षी हे अंतर 3 तास 40 सेकंदामध्ये पार करण्यात आले होते. महिला स्पर्धकांमधील नुपुर सिंग यांनी 4 तास 15 मिनिटे व 17 सेकंदामध्ये 50 किलोमिटरचे अंतर पार करत महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. जागतिक पात्रता पातळीत बसणारे 1400 धावपटू या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये 200 महिला स्पर्धकांचा सहभाग होता. मागील वर्षी झालेल्या एशिया अल्ट्रा रन मधील सर्व भारतीय धावपटू तसेच आर्मीचे स्पर्धक आजच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. जागतिक पातळीवरील सर्वात अवघड समजली जाणारी साऊथ अफ्रिका येथिल काॅम्रेड अल्ट्रा ह्या 90 किमी अंतराच्या स्पर्धेचा रुट व लोणावळ्यातील रुट समान असल्याने सरावा करिता मागील तिन वर्षापासून लोणावळ्यात टाटा अल्ट्रा ही स्पर्धा आयोजित केली जाते. टाटा अल्ट्रा स्पर्धेतील पात्र खेळाडूंनाच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने ही स्पर्धा देशभरातील खेळाडूंना जागतिक स्तरावरील अल्ट्रा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता महत्वाची असते अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक व स्टायडर रेस डायरेक्टर दीपक लोंढे व अँथलेटिक फेडरेशन आँफ इंडियाचे आनंद मेनेजेस यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेमधून जागतिक स्तरावरील गोल्डन लेव्हल ठरविता येते, सदरची स्पर्धा ही बीएसएफ मान्यताप्राप्त व एएफआयच्या नियमांप्रमाणे घेण्यात येते. भारतातील ही महत्वाची स्पर्धा असून दरवर्षी स्पर्धेत धावपटूंचा सहभाग वाढत आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मेनेजेस यांनी सांगितले. लोणावळ्यातून पहाटे 2.30 वाजता स्पर्धेला सुरुवातलोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली. लोणावळा, आयएनएस शिवाजी मार्गे घुसळखांब, सहारा इंडिया गेट येथून फिरुन पुन्हा घुसळखांब, तुंग, तिकोना दरम्यान ही स्पर्धा पार पडली. स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी धावताना खेळाडूंना हेडटाॅर्च लावण्यात आल्या होत्या. पवन मावळातील ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा ह्या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे दीपक लोंढे यांनी सांगितले.