पिंपरी : आमच्यासारखे कलावंत व हिंदुस्थान जोपर्यंत असेल, तोपर्यंत हिंदुस्थानी संगीत जिवंत राहील, असे मत प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांनी व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर २१ व्या ‘स्वरसागर’ संगीत महोत्सवास सुरुवात झाली. महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी सुलताना बोलत होत्या. यावेळी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रसिद्ध गायक महेश काळे, उपमहापौर तुषार हिंगे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी महापौर राजू मिसाळ, अनुराधा गोरखे, सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, रोख पंचवीस हजार, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. परवनी सुलताना म्हणाल्या, ‘‘भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतास मोठी पंरपरा आहे. ही परंपरा आपण जपायला हवी. पंधरा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड शहरात आले आहे. पुरस्कार मिळाल्याने अत्यानंद झाला आहे. संगीत रसिक या ठिकाणी आहेत याची अनुभूती मला आली आहे. मला स्वरसागर पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार हे प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असतात. भारतीय संगीत हे चिरकाल टिकणारे आहे.’’ कार्यक्रमाआधी संदीप उबाळे, योगिता गोडबोले आणि सुवर्णा राठोड यांचे मराठी सुगम संगीत सादर झाले.
हिंदुस्थान असेल तोपर्यंत संगीत जिवंत राहील : बेगम परवीन सुलताना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 1:59 PM
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतास मोठी पंरपरा
ठळक मुद्देनिगडी प्राधिकरणातील सोहळ्यात स्वरसागर पुरस्कार प्रदान