पवनानगर : पवनानगर परिसरात बुधवारी सायंकाळी सातनंतर सुमारे तासभर जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पवन मावळात इंद्रायणी भाताची कापणी अखेरच्या टप्प्यात होती. तर आंबेमोहर भाताची कापणी सुरू झाली होती. गेल्या दोन दिवसांत थंडी थोडी कमी होऊन उकाडा वाढला होता. मात्र, पाऊस अचानक कोसळेल, याची शेतकऱ्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. यामुळे त्यांनी भाताची कापणी सुरूच ठेवली होती, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडविली. शेतीचे विशेषत: काढणीला आलेल्या किंवा काढलेल्या भाताचे नुकसान झाले आहे. ज्यांची झोडणी झाली, त्यांचा पेढा भिजला आहे. तर ज्यांनी नागरणी केली, त्यांच्या पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मसूर, वाटाण्याची पेरणी केली आहे, त्यांची पिके दबण्याचा धोका निर्माण झाला झाला आहे.या वर्षी वरुणराजाने कृपा केल्याने अधिक भात उत्पादन मिळण्याच्या आशेने आनंदात असलेल्या बळीराजास बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या अवकाळी पावसाने चिंताग्रस्त केले आहे. नाणे मावळातही बुधवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली. (वार्ताहर)
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Published: November 18, 2016 4:50 AM