किवळे : उत्तमनगर (किवळे) येथील फार्म हाऊसमध्ये चार मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकावर मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ऐन वेळी पिस्तूल लॉक झाल्याने गोळी सुटली नाही. सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेतून युवक बचावला. दादा ऊर्फ गोरख लक्ष्मण तरस (वय ४२, रा. किवळे) असे हल्ल्यातून बचावलेल्या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा ऊर्फ गोरख लक्ष्मण तरस (वय ४२, रा. किवळे) हे दुर्गादेवी उत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. उत्तमनगर (किवळे) येथील फार्महाऊसवर शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दादा तरस हे दत्ता काटकर, दिलीप बुर्डे, संतोषकुमार या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्या वेळी मोटारीतून आलेल्या आणि चेहरा झाकलेल्या दोन अज्ञात तरुणांनी फार्म हाऊसमध्ये अचानक प्रवेश केला. दोघांनी हातातील पिस्तूल तरस यांच्या दिशेने रोखले. जवळून दोन गोळ्या झाडल्या़ मात्र हल्लेखोराचे पिस्तूल ऐनवेळी लॉक झाले. देहूरोड उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर, पोलीस निरीक्षक अरुण मोरे, विनोद घोळवे, गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार व त्यांचे सहकारी यांचे घटनास्थळावर पोहोचलो. घटनास्थळांवर दोन पुंगळ्या आढळल्या.
पिस्तूल लॉक झाल्याने युवकाला जीवदान, किवळेतील घटना, हल्लेखोर फरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 5:10 AM