वाकड : वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टीतून शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चार वर्षांचा चिमुरडा गायब झाला होता. आई वडिलांनी सगळीकडे शोधाशोध घेतला पण हाती निराशाच पडत होती. त्याच्या काळजीने संपूर्ण परिसर चिंताग्रस्त झाला होता. आजूबाजूच्या लोकांनीही आपआपल्यापरीने तपास करणे सुरुच होते . त्यानंतर चिमुरड्याच्या कुटुंबाने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार केली. तब्बल चार तासांनी पोलिसांना सार्वजनिक शौचालयात तो सुखरूप सापडला. आरोस समाधान मस्के (वय ४) असे त्या बालकाचे नाव आहे. सकाळी बाराच्या सुमारास तो घरातून गायब झाला होता काही वेळ इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर त्याच्या आईने वाकड ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. वाकड पोलिसांनी त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करत सापडल्यास वाकड पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले. हा मॅसेज सर्वत्र व्हायरल होत असताना वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी या चिमुरड्याच्या शोध मोहिसाठी ९० कर्मचारी व १० पोलीस अधिकारी नेमले. यासर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिसरातील ड्रेनेज, पाणी तलाव. सीसी टीव्ही, मोठ्या गटारी, सार्वजनिक शौचालये पालथे घालत वाहने देखील तपासली.या शोध मोहिमेदरम्यान सहायक निरीक्षक संतोष घोळवे व पोलीस नाईक अशोक दुधावने हे दोघे म्हातोबानगर येथील सार्वजनिक शौचालय तपासात असताना त्यांनी एका बंद शौचालयाचा दरवाजा त्यांनी जोराने ढकलला असता तो चिमुरडा आत उभा राहिल्याचे दिसले. त्याच्या पायात शौचालय साफ करण्याचा ब्रश अडकल्याने त्याला दरवाजा उघडता येत नव्हता. यानंतर त्यानेही बराच प्रयत्न केला आणि रडून रडून थकलेल्या त्या आरोसने शांत उभे राहणे पसंत केले. यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.