पिंपरी : एका पायाने अपंग असलेला अनंत मादळे दिवसभर डिलिव्हरी बॉय म्हणून अन्नपदार्थांची घरपोच सेवा देतात. इमारतीत लिफ्ट असेल तर लिफ्टने, नसेल तर पायऱ्या चढून घरपोच अन्नपदार्थ पोहोचवण्याचे काम करतात. आपल्या अपंगत्वावर मात करून दिवसभर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून घरचा गाडा हाकतात.
अनंत मादळे मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील. वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओ झाला, यात डाव्या पायाला अपंगत्व आले. तरीही न खचता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आई-वडील शेतकरी, घरी जेमतेम शेती, तीही कोरडवाहू. पावसाचे पाणी साठवून शेती करायची. शेतीत खरीप पिके घ्यायची. त्यातही कधी-कमी पाऊस पडतो, तर कधी अवकाळी पाऊस पडतो. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो.
शेतीच्या या दृष्टचक्राला वैतागून अनंत यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. २०१४ला पिंपरीतील नेहरूनगरमधील मावस भावाकडे राहायला आले. त्यांच्याकडेच टेलरिंगचे काम शिकले; पण एका पायावर टेलरिंगचे काम करताना अडचणी येऊ लागल्या. तेव्हा ते काम सोडून दुसरे काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एका मॉलमध्ये सेल्समन म्हणून काम लागले. तीन वर्षे सेल्समन म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न झाले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना कोरोना आला. कोरोनात सर्वांना फटका बसला. त्यात अनंत यांचेही काम गेले. त्यावेळी संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी पिंपळे निलखमधील पेट्रोल पंपावर कामाला सुरुवात केली. तेथे दोन वर्षे वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरायचे काम केले; पण पगार कमी असल्याने घरखर्च भागत नव्हता. म्हणून नवीन काम करण्याचे ठरविले. मात्र, खासगी कंपन्यांचे उंबरे झिजवूनही दिव्यांग असल्याने काम मिळत नव्हते. तेव्हा त्यांना समाजमाध्यमावर स्वत:चा व्यवसाय करण्याची जिद्द असलेल्यांसाठी एक स्वयंसेवी संस्था मदत करत असल्याची माहिती मिळाली. या संस्थेच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी अल्प दरात इलेक्ट्रिक दुचाकी दिली जात होती. अनंत यांनी या संस्थेशी संपर्क करून इलेक्ट्रिक दुचाकी घेतली. तसेच त्यांना सहा दिवसांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण संस्थेने दिले. त्यानंतर खऱ्या अर्थाने अनंत यांचे आयुष्य बदलले. त्याच दुचाकीच्या मदतीने अनंत अन्नपदार्थ पुरवणाऱ्या खासगी कंपनीचे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. अपंगत्वावर मात करत अनंत यांनी मोठ्या धाडसाने हे काम स्वीकारले आहे. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या संसारामध्ये खऱ्या अर्थाने ‘अनंत’ आनंद आला आहे.
महिन्याकाठी तीस हजारांची कमाई
अनंत म्हणाले, आई-वडील, बायको, चार वर्षांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मी इलेक्ट्रिक दुचाकीवर दिवसभर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. दिवसभरात अन्नपदार्थ घरपोच पोहोचविण्याच्या दहा-बारा ऑर्डर मिळतात. ऑर्डर द्यायला गेल्यावर त्या इमारतीत लिफ्ट असेल तर लिफ्टने, नसेल ग्राहकाला खाली येण्याची विनंती करतो. त्यांनी नकार दिल्यास पायऱ्या चढून घरपोच अन्नपदार्थ पोहोचवतो.