शीतल मुंडे पिंपरी : शहरातील पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेने ६० हजार वृक्ष लागवड करण्याचा निश्चय केला आहे. त्यांपैकी चार हजार वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य महापालिकेने मेट्रोला दिले आहे. परंतु, महामेट्रोला अद्यापही वृक्ष लागवडीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. आतापर्यंत साडेतीनशे वृक्षांची लागवड व पुनर्रोपण केल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी ते दापोडी या मार्गावरून मेट्रोचा मार्ग जाणार आहे. महामेट्रोने काम सुरू केल्याने महापालिकेचे ४६८ मोठे वृक्ष बाधित होणार आहेत. शिवाय ग्रेड सेपरेटरवर उभारलेली शेकडो फुलझाडे व झुडपे नष्ट होत आहेत. त्या बदल्यात महामेट्रोने वृक्षांचे पुनर्रोपण व नव्याने लागवड करण्याचे लेखी पत्र महापालिकेच्या उद्यान विभागाला दिले आहे. त्यानुसार महापालिकेने वर्षभरात ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांपैकी चार हजार झाडे लावण्याची जबाबदारी मेट्रोने घेतली असतानाही वृक्ष लागवडीसाठी वेळकाढूपणा सुरू आहे. मेट्रोकडून सुरुवातीला एचएच्या मैदानावर वृक्षलागवड करण्यात येणार होती. मात्र, एचएने परवानगी नाकारल्याने आता औंध व पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. लष्कराकडून वृक्ष लागवडीस परवानगी मिळाली आहे. तरीही मेट्रोकडून वृक्ष लागवडीस सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात लागवड न केल्याने आता वृक्ष लागवडीसाठी अतिरिक्त पाणी लागणार आहे. लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षात आंबा, चिंच, लिंब, वड, साग, पिंपळ अशा सर्व झाडांचा समावेश असणार आहे. लागवड केलेल्या झाडांची तीन वर्षे देखभाल करण्याचे काम मेट्रो करणार आहे. पावसाळा संपून थंडी सुरू झाली, तरी मेट्रोकडून अद्याप वृक्षलागवड सुरू झालेली नाही. ..................शहरामध्ये महामेट्रोच्या कामासाठी वृक्ष तोडण्यात आले होते. त्याबदल्यात महापालिकेने महामेट्रोला चार हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य दिले होते. पिंपळे सौदागरमध्ये जागाही उपलब्ध करून देण्यात आली. तरीही वृक्षलागवड करण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्याबद्दल उद्यान विभागाला कोणतीही माहिती मेट्रोने कळविलेली नाही- प्रकाश गायकवाड, उद्यान अधीक्षक (वृक्षसंवर्धन)
...............पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महामेट्रोच्या कामावेळी वृक्षतोड करण्यात आली. मेट्रोकडून चार हजार वृक्षांची लागवड शहरामध्ये करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेने १० एकर जागा वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध करून दिली आहे. एक आॅक्टोबरला महानगरपालिकेचे पत्र मिळाले आहे. त्या जागेची पाहणी केली असून, वृक्ष लागवडीचे काम लवकरच सुरू करणार आहोत. - हेमंत सोनवणे, महाप्रबंधक,जनसंपर्क विभाग, मेट्रो