पिंपरी : काळेवाडी येथील खुशी मुल्ला हिची १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. खुशीने थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमी येथे १० वर्षांपूर्वी प्रवेश घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील गटात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तिला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
वेराॅक वेंगसरकर अकादमीचे क्रिकेट प्रशिक्षक शादाब शेख म्हणाले की, महापालिकेने क्रिकेट खेळासाठी प्रशस्त मैदान तसेच सरावादरम्यान पावसाने व्यत्यय येऊ नये यासाठी बंदिस्त इनडोअर हॉल उपलब्ध करून दिल्यामुळे सराव करण्यास सुलभता निर्माण झाली.
लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊ राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळायचा. अकादमीमध्ये शादाब शेख, श्रीकांत कल्याणी, भूषण सुर्यवंशी, डाॅ. विजय पाटील या मार्गदर्शकांनी उत्तम सराव करून घेतल्याने आत्मविश्वास वाढला. कर्णधारपदी निवड झाली, याचा अतिशय आनंद आहे. - खुशी मुल्ला
खुशीला लहाणपणापासूनच क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊ अमनने क्रिकेटमध्ये १९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्यापासूनच खुशीने प्रेरणा घेतली.- नवीलाल मुल्ला, खुशीचे वडील