पिंपरी : भोसरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार दिला नाही. त्यामुळे नगरसेवक दत्ता साने आणि माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज भरत विधानसभेच्या रणांगणात उडी घेतली. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दत्ता साने यांनी माघार घेतली. त्यामुळे भोसरी मतदारसंघामध्ये माजी आमदार विलास लांडे आणि महायुतीचे विद्यमान आमदार यांच्यामध्ये दुरंगी लढत होणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. यावेळी अपक्ष उभे राहिलेले विलास लांडे यांनी मतदारसंघाचा प्रथम आमदार होण्याचा मान मिळविला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या महेश लांडगे यांना भोसरीकरांनी कौल दिला. यंदाच्या निवडणुकीत विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्यास नकार देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्याबरोबरच गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनीही उमेदवारी न घेता अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने विलास लांडे यांना पुरस्कृत करत साने यांना माघार घेण्यास भाग पाडले. परिणामी भोसरी मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होणार आहे. तर इतर पक्ष व अपक्ष ही १० उमेदवार रिंगणात असणार आहे. महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. बैठका व गाठीभेटींवर जोर दिला आहे. त्यासोबतच माजी आमदार विलास लांडे यांनीही आपला प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना बळ दिले जात आहे. यामध्ये जालिंदर शिंदे आणि दत्ता साने यांनीही मदत केली आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवाराला कौल देणारे भोसरीकर यंदा कुणाला आमदार करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. .........................दत्ता साने ठरणार किंगमेकरभोसरी मतदारसंघामध्ये झालेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये दत्ता साने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २००९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मंगला कदम यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीला साने यांनी विरोध केला होता. विलास लांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्या वेळी लांडे यांना साथ देत दत्ता साने यांनी निवडून दिले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने लांडे यांना उमेदवारी जाहीर केली. तेव्हा साने यांनी तीव्र विरोध केला. तेव्हाही अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांना साथ देत त्यांना निवडून आणले. साने यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे. मात्र आता साने यांनी अर्ज मागे घेत विलास लांडे यांना पाठिंबा दिला आहे. या आजी-माजी आमदारांच्या लढतीमध्ये दत्ता साने किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
Maharashtra Election 2019 : आजी माजी आमदारांमध्ये रंगणार भोसरी विधानसभेचा आखाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 6:32 PM
भोसरीकर कुणाला कौल देणार?
ठळक मुद्देभोसरी विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये आला अस्तित्वात दत्ता साने ठरणार किंगमेकर