हणमंत पाटील
पिंपरी : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मावळात १९९५ ला भाजपाने बंडखोरी करणारांना तिकीट देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी होत आहेत. भाजपाचा विजयाचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एक पाऊल मागे घेत ‘१९९५ च्या फॉर्म्युल्या’नुसार त्याच पक्षातून बंडखोरी केलेले उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जुना फॉर्म्युला यशस्वी करायचा की राज्यमंत्री बाळा भेगडे यांना हॅट्ट्रिक करू द्यायची याचा निर्णय मावळवासीयांच्या हाती आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारीवर १९९५ ला रुपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या. त्यानंतर सलग दोन वेळा दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे निवडून आले आहेत. तीन महिन्यांपूर्वी बाळा भेगडे यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी त्यांनी मावळात आणला. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी तिसºयांदा उमेदवारीवर दावा केला.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भाजपाचे कार्यकर्ते व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, तसेच पक्ष संघटनेतील युवा कार्यकर्ते रवींद्र भेगडे यांनीही मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा केला होता. भाजपाकडून तिन्ही इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने बंडखोरीच्या भीतीने पहिल्या यादीत मावळची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने पुन्हा एकदा बाळा भेगडे यांना पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षातील बंडखोरीचे आव्हान बाळा भेगडेंपुढे आहे. या निवडणुकीतील समीकरणामुळे सर्वांना १९९५ च्या निवडणूक फॉर्म्युल्याची आठवण ताजी झाली आहे.भाजपातील बंडखोरीने राष्ट्रवादीला ताकदगेल्या काही वर्षांच्या इतिहासात मावळ भाजपात बंडखोरी झालेली नाही. परंतु, राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली. त्यामुळे सुनील शेळके यांनी भाजपा नगरसेवक पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत ऐनवेळी प्रवेश करीत उमेदवारी स्वीकारली. तसेच, रवींद्र भेगडे यांनीही बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपातील बंडखोरीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एक पाऊल मागे घेत आयात सुनील शेळके यांचा स्वीकार केला. शिवाय राष्ट्रवादीतून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या बाळासाहेब नेवाळे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपातील गटबाजीचा व बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी होण्याची शक्यता आहे.