पिंपरी-चिंचवड : विधानसभा निवडणूक कोणाविरोधात लढायची हेच कळत नाही. आमचे पहिलवान निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, पण पुढे कोणीच नाही. काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले आहेत आणि इकडे शरद पवार यांची अवस्था ‘शोले’ सिनेमातील ‘जेलर’ सारखी झाली आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आओ’ प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामागे कोणीच नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.
पिंपरी-चिंचवड येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा रहाटणी येथे गुरुवारी झाली. या वेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
‘‘सुशीलकुमार शिंदे हे द्रष्टे नेते आहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय होणार हे कळले आहे. म्हणूनच त्यांनी सोलापूरमध्ये आम्ही थकलो आहे. आमच्याने काही होणार नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी विलीनीकरणाची भाषा त्यांनी केली. काँग्रेस आघाडीची अवस्था अशी बिकट झाली आहे की, त्यांना विरोधी पक्षनेताही निवडता येणार नाही. त्यासाठी लागणाºया १० टक्के जागाही निवडून येणार नसल्याची खात्री सुशीलकुमार शिंदे यांना पटल्यानेच त्यांनी विलीनीकरणाची भाषा सुरू केली आहे, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मारला.