पिंपरी : भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी आघाडीतर्फे काही उमेदवारांना पुरस्कृत केले तर काही अपक्षांना पाठिंबा दिला आहे. निवडून येणे हे एकच ध्येय असून, आघाडीचे १७५ आमदार निवडून येतील, अशी खात्री असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे राष्ट्रवादीची बुधवारी बैठक झाली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.पवार म्हणाले, पिंपरीसह काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागले. भोसरी व चिंचवड मतदारसंघात आमचे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी संपली, अशी चर्चा झाली. मात्र असे नाही. चिंचवड मतदारसंघात आमच्या उमेदवाराचा ए व बी फॉर्म वेळेत पोहचू शकला नाही. त्यामुळे उमेदवाराला माघार घ्यायला सांगून अपक्षाला आघाडीतर्फे पाठिंबा दिला आहे. भोसरी मतदारसंघातही पुरस्कृत उमेदवार दिला आहे. निवडून आल्यानंतर या उमेदवारांनी आघाडीसोबत रहावे, असे त्यांना सांगण्यात आले असून, त्यांनी ते मान्य केले आहे. भोसरी, पिंपरी व चिंचवड या मतदारसंघात मनसेचा उमेदवार नाही. त्यामुळे त्यांनीही या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती मनसेला करण्यात आली आहे.
'मी पवारसाहेबांच्या बाहेर नाही'...मी पवारसाहेबांच्या बाहेर नाही, पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांबाबत पक्षातील वरिष्ठांशी चर्चा केली. येथील निवडणूक चुरशीची व्हावी व निवडून येणे हेच ध्येय असल्याने उमेदवार बदलणे, पुरस्कृत करणे तसेच पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतले. काँग्रेसच्या भूमिकेबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलू. आमच्यात वाद नाही. पक्षातील सर्वांची नाराजी काढण्यासाठीच मी समक्ष येथे आलो आहे, असे अजित पवार म्हणाले.
''मी रडणारा, पळणारा माणूस नाही''राज्य सहकारी बँकेत माझे नाव आहे, त्यामुळे शरद पवार यांचे नाव त्यात गोवण्यात आले. याचे मला दु:ख आहे. त्यातूनच मी भावनिक झालो. मात्र मी स्व:ताला सावरले. मी रडणारा, पळणारा माणूस नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
' चंपा'ला पवारांशिवाय काही दिसत नाही...चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील यांना पवारांशिवाय काही दिसत नाही. त्यामुळे शरद पवार व आमच्यावर सतत टीका करतात. उद्धव ठाकरे यांचेही तसेच आहे. त्यांनाही राष्ट्रवादीशिवाय काय दिसणार? पाच वर्षे सत्तेत राहूनही त्यांनी आश्वासनांची पूर्ती केली नाही, असे अजित पवार म्हणाले.