भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलीयन डॉलर असेल : अजित पवार
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: August 25, 2023 04:19 PM2023-08-25T16:19:03+5:302023-08-25T16:19:03+5:30
उपमुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर ...
पिंपरी : मला पहिल्यापासून कुठल्याही विकास कामात लक्ष घालायला आवडत. ती माझी पॅशन आहे. तळेगावमधील जनरल मोटर्सचा उद्योग बंद पडला आहे. त्याठिकाणी ह्युंदाईचा प्रकल्प कसा येईल हे पाहिले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील धरणांचा नव्याने विचार करावा लागणार आहे. या धरणांमधून वीज निर्मिती कशी सुरु करावी? यावर विचार करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था टॉप पाचमध्ये आली आहे. आता टॉप तीनमध्ये आणण्याचे उद्दिष्ट आहे, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार शुक्रवारी (दि.२५) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होेते.
पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी आढावा घेतला जात आहे. पवना बंद जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचेही लवकरच मार्गी लावणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मार्ग काढला जाणार आहे. स्मार्ट सिटी अभियानावरही चर्चा केली जाणार आहे. शहराचे वाढते विस्तारीकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी बोलणार आहे. त्या नवीन भागाला सर्व पायाभूत सुविधा आणि पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुळशी, मावळातील टाटा धरणाचे तसेच डोंगरावरून कोकणात वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा उपयोग शहरासाठी कसे करता येईल, याचा विचार करण्यात येणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
सायन्स सिटी पुण्यातच...
सायन्स सिटी हा पिंपरी-चिंचवड शहरातच होईल, असे काही नव्हते. तो कोण्या एका शहराचा प्रकल्प नाही. त्यात केंद्र शासनाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे तो प्रकल्प केंद्र सरकार सांगेल तिथेच होणार आहे. त्या प्रकल्पासाठी कमीत कमी ३० एकर जागा अपेक्षित आहे. तशी जागा पुण्यात मुंढवा येथे आहे. त्या जागेचा विचार सुरू आहे. त्यामुळे तो प्रकल्प पुण्यातच होण्याची शक्यता असल्याचे पवारांनी सांगितले.