पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील नेत्यांची गटबाजी आणि पक्षातील नेत्यांचे बोटचेपे धोरण यामुळे पुन्हा चौथ्यांदा अपयश आले. चिंचवड विधानसभेत गेल्या तीन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधील पक्षांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी पाहता एकजूट नसल्याचा आणि गावकी भावकीचा फटका पूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता महाविकास आघाडीला बसला आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महविकास आघाडीतील दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ही परंपरा कायम आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली पकड घट्ट करण्याची गरज आहे.
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. २००९, २०१४, २०१९ या तीनही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षीय मतविभागणीचा फायदा कधी अपक्ष बंडखोराने, तर कधी भाजपने उचलला आहे. ताकद असतानाही अजित पवार यांची दादागिरी कमी पडल्याचे दिसून येत आहे.
बंडाळी रोखण्यात अपयश
पिंपरी- चिंचवड महापालिकेत राजकारण असो की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील बंडाळी रोखण्यात आजपर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना अपयश आले आहे. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी दिली. असे असताना राष्ट्रवादीच्या महापौर, नगरसेवकांनी अपक्ष लक्ष्मण जगताप यांचा प्रचार केला होता. राष्ट्रवादीतील माजी स्थायी समिती सभापती विलास नांदगुडे यांनी एकाने बंड केले होते. तसेच २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या विरुद्ध सहा अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले होते. तसेच याचवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी राहुल नार्वेकर यांना दिली होती. त्यावेळी अपक्ष उमेदवार जगताप यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार रिंगणात उतरविला नाही. अपक्ष राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीतील नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी कमळ चालविले. २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ कायम होता.