पिंपरी : उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते. त्यामुळे मानवता नष्ट करण्याचे सामर्थ्य अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये आहे. त्यापासून जगाला, भारताला वाचवायचे असेल तर भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी यांच्या विचारांची बेरीज करणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कासारवाडी येथे व्यक्त केले.
भगवान महावीर शिक्षण संस्था आणि बंधुता प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने नाशिक फाटा येथील स्वर्गीय प्यारीबाई पगारिया सभागृहातील डॉ. अशोककुमार पगारिया लिखित ‘संघर्षयात्रेची यशवंतगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ विचारवंत जे. पी. देसाई, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, अभय संचेती, मोहनलाल चोपडा, सुनील यादव, प्रा. सदाशिव कांबळे, विलासकुमार पगारिया, अॅड़ अभय छाजेड, पारस मोदी, रूचिरा सुराणा, प्रकाश कटारिया, प्रकाश जवळकर, वसंत बोरा, महेंद्र भारती, शैलेश पगारिया, विजय पारख आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रा. पगारिया यांनी आपली संघर्षगाथा यशवंतगाथा केली आहे. आर्तरूपाने अनेक दु:खे, आघात सहन करीत त्यांनी जीवन घडविले आहे. समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. हे व्यक्तीचे आत्मचरित्र असले तरी समाजमनाशी जोडले गेलेले आहे. जीवन जगण्याची एक पद्धती आहे. आजचे व्यासपीठ हे संवादाचे व्यासपीठ आहे. गौतम बुद्ध, महावीर अशा विचारधारा व्यासपीठावर एकवटल्या आहेत. भगवान महावीरांनी अहिसेंचा विचार घेऊन मानवतावाद जपला. हा संस्कार पुढे नेण्याचे काम प्रा. पगारिया करीत आहेत.’’
प्रामाणिक आत्मकथनाचा अभाव
डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘कोणतेही साहित्य किंवा आत्मकथन हे वास्तववादी असायला हवे. प्रामाणिक आत्मकथन हवे. आत्मकथनात हातचे राखून लिहिण्याची वृत्ती अधिक प्रमाणावर वाढत आहे. मात्र, पगारिया यांचे आत्मकथन हे वास्तववादी आणि प्रामाणिक असल्याचे ते वाचताना दिसून येते.’’
दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘सकारात्मक दृष्टी असणारे पगारिया हे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आंबेगाव तालुक्याचा हा सुपूत्र एसएससी बोर्डात प्रथम आला. त्या वेळी त्यांच्या रूपाने सर्वप्रथम वृत्तपत्रात तालुक्याचे नाव झळकले होते. समाजकारण, शिक्षण, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रांत लौकिक मिळविला असला तरी त्यांची मातीशी नाळ कायम आहे.’’
प्रा. पगारिया यांनी मनोगतात संघर्षयात्रेचा पट उलगडून दाखविला. श्रेयस पगारिया यांनी स्वागत केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. दर्शना पारख यांनी कविता सादर केली. प्रकाश रोकडे यांनी प्रास्ताविक केले. सदाशिव कांबळे यांनी आभार मानले.