देहूगाव : येथील एका घरगुती वीज ग्राहकाला चालू महिन्याचे विजेचे बिल चक्क १ लाख ९१ हजार ३० रुपये आल्याने धक्काच बसला आहे. महावितरणकडून त्यांना संपूर्ण बिल भरावे लागेल, अन्यथा वीज जोड तोडण्यात येईल, असे सांगितल्याने ते हवालदिल झाले आहेत.
देहूगाव विठ्ठलनगर येथील काळुराम तुकाराम रासकर यांना नोव्हेंबर महिन्याचे वीज बिल १ लाख ९१ हजार ३० रुपये आले आहे. मात्र, काळुराम रासकर यांच्या म्हणण्यानुसार मी प्रत्येक महिन्याला नियमित वीज बिल भरत आहे. त्यानंतरही मला एवढे बिल कसे आले. याबाबत त्यांनी येथील महावितरणचे सहायक अभियंता संतोष वाघमारे यांच्याकडे जाऊन बिल दाखवले असता त्यांनी म्हणणे ऐकून न घेता दाद दिली नाही. तर त्यांना संबंधित विजेचे संपूर्ण बिल भरावे लागेल नाहीतर वीज जोड तोडण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. याबाबत अधिकची माहिती घेतली असता.
काळुराम रासकर यांना डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत प्रतिमहिना १०९० रुपये, एप्रिल २०२२ ते जून २०२२ पर्यंत १११० रुपये, जुलै २०२२ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत १२२० रुपये बिल आले होते. ही सर्व बिले त्यांनी भरली आहेत. मात्र, नोव्हेंबर २०२२चे बिल मात्र एकदम १ लाख ९१ हजार ३० रुपये आले. याबाबत त्यांना संबंधित अधिकारी दाद देत नाही. याबाबत येथील सहायक अभियंता संतोष वाघमारे म्हणाले की, त्यांचे बिल पाहून त्याचे विभागणी करून पाहू, एवढे बिल कसे आले आहे, याची माहिती घेऊन त्यांना टप्पे ठरवून देता येतील, असे सांगितले.