पिंपरी : शहरातील एकूण ८१८ गणेशोत्सव मंडळांपैकी ४३ मंडळांनी महावितरणकडून अधिकृत परवाना घेऊन वीजजोड घेतला आहे, तर उर्वरित मंडळांनी अद्यापही परवाने घेतलेले नाहीत. ओटास्किम, निगडी, भाटनगर, पिंपरीतील काही मंडळांनी विजेच्या खांबावर आकडे टाकून अनधिकृत वीजजोड घेतला आहे. पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, भोसरी, चिखली या भागात रस्त्यावर खड्डे खोदून काही मंडळांनी मंडप उभारणी केली आहे. काही मंडळांनी ध्वनिक्षेपक वापरासाठीचा पोलिसांकडून परवाना घेतलेला नाही. परवान्यांची ऐशीतैशी अशी स्थिती सध्या शहरात आहे. गणेशोत्सव असो, की अन्य कोणताही धार्मिक उत्सव सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील विषय असल्याने अधिकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची भूमिका घेत नाहीत. परंतु उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांना त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. विद्युत महावितरणकडे विशिष्ट रक्कम अनामत स्वरूपात भरून रीतसर अर्ज करून गणेशोत्सव काळासाठी वीजजोड घेता येते. परंतु विद्युत वितरणकडे अर्ज न करता, परिसरातील विद्युत डीपी अथवा विजेच्या खांबावर तारेचे आकडे टाकून काहींनी वीजजोड घेतली आहे. त्या विजेवर गणेशोत्सवातील देखाव्याची रोषणाई सुरू आहे. (प्रतिनिधी)रहदारीस अडथळा ठरणारे मंडपकाही मंडळांनी भर रस्त्यात मंडप उभारले आहेत. अगदी बसथांब्याला लागून उभारलेल्या मंडपामुळे बसथांबा दिसून येत नाही. अर्धा रस्ता मंडपाने व्यापला असल्याने अगोदरच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद झाला आहे. शाळेच्या परिसरात भर रस्त्यात मंडप उभारले असल्याने विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्यांना वाहनचालकांना अडथळ्यांच्या शर्यतीचा अनुभव येत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी संबंधित मंडळे असलेल्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी काणाडोळा करतात. त्यामुळे हे दृश्य शहरात अनेक ठिकाणी पाहवयास मिळत आहे. पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशनगणेशोत्सव काळातील सुरक्षिततेच्या उपाययोजनेंतर्गत पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये तपासणी मोहीम राबवली जात आहे. तडीपार गुन्हेगार गणेशोत्सव काळात या परिसरात वावरत आहेत का, याची माहिती पोलीस घेत आहेत. एवढेच नव्हे, तर लॉजवर छापे टाकून तपासणी केली जात आहे. गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सजग झाली असून, संशयितांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष वेधले आहे.
महावितरणला कार्यकर्त्यांकडून झटका
By admin | Published: September 09, 2016 1:24 AM