पिंपरी : विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवडभाजपा अध्यक्ष निवड लांबणीवर पडली होती. येत्या दोन दिवसांत अध्यक्ष निवडला जाणार असून विद्यमान आमदारांपैकी एकाने जबाबदारी घ्यावी, यासाठी पक्षश्रेष्ठी आग्रही आहेत. विद्यमान शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर महेश लांडगे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे सरकार स्थापन केल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर जगताप यांनी पक्षबांधणीसाठी जोर लावला होता. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह समर्थकांनी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत जगताप आणि लांडगे यांच्या जोडीने ताकद लावल्याने तीन सदस्यांवरून भाजपाची सदस्य संख्या ७७ वर गेली.राष्ट्रवादी सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने आमदार जगताप यांनाच संधी देणार की नवीन सदस्यांचा विचार करणार? याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील काही शहरांचे अध्यक्ष निवडले गेले. मात्र, पिंपरी-चिंचवडची निवड झाली नव्हती. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय पातळीवरील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. शहरातील सहा गटांतील सुमारे बाराशे बूथ कमिट्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर यामधूनच अध्यक्ष निवड करण्यात येते.........जगताप अनुत्सुक असल्याची चर्चाभाजपा शहराध्यक्षपदी दमदार नेतृत्व असावे, असा आग्रही भाजपातील ज्येष्ठ नेत्यांचा आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांप्ौकी एकाचा विचार होणार आहे. आमदार जगताप यांनी शहराध्यक्षपद भूषविल्याने ते हे पद पुन्हा घेण्यास अनुत्सुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी शहराध्यक्षपद भूषवावे, यासाठी पक्ष आग्रही आहे. त्यामुळे महेश लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. ...........जुन्यांची मोर्चेबांधणीभाजपा शहराध्यक्षपदी जुन्यांचीही वर्णी लागावी, यासाठी भाजपातील एक गट आग्रही आहे. प्रदेशच्या नेत्या आणि माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे आणि सरचिटणीस अमोल थोरात यांच्याही नावांची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या नावाबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. येत्या दोन दिवसांत अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले.
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी महेश लांडगे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 6:32 PM
नवीन वर्षात भाजपात खांदेपालट : आमदारांसाठी पक्षश्रेष्ठी आग्रही
ठळक मुद्देआमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर महेश लांडगे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा