पिंपरी : बहीण आणि भाऊ यांच्यातील अतूट नात्याला आणखी घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण! या सणाला भावाच्या मनगटावर राखी बांधून पाठीशी ठाम उभे राहण्याचे वचन घेण्याची ही परंपरा सध्याच्या व्हाट्सअपच्या जमान्यातही सुरू आहे. दूरवरच्या भावाला राखी वेळेत पोहाचावी यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व पोस्ट आॅफिस कार्यालयांत राखी पोस्टाने पाठविण्यासाठी गर्दी होत आहे.नोकरी, व्यवसायानिमित्त अनेकांना आपल्या घरापासून दूर राहावे लागते. या धावपळीत आपल्या जीवलगांची भेट होत नाही. अशा वेळी पोस्टाने राखी पाठवण्यासाठी सध्या लगबग दिसून येत आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, मासूळकर कॉलनी, कासारवाडी, काळेवाडी, भोसरी येथील पोस्ट कार्यालयात राख्या पाठविण्यासाठी महिलावर्गाने मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. सोमवारी (दि. ७) रोजी रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे.राख्या पाठविण्यासाठी कुरिअर आणि पोस्टामार्फत राखी पाठविली जात आहे. गेल्या आठवडाभरापासून कुरिअर सेवेमध्ये आणि पोस्ट आॅफिसमध्ये राखी पाठविण्यासाठी गर्दी वाढली आहे. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त राखी पाठविण्यासाठी यंदा टपाल खात्याने खास पाकिटे तयार केली या पाकिटांचा दर दहा रुपये आहे. शहरात पोस्ट कार्यालयात राखी मेल बॉक्समधून राख्या पाठवण्यासाठी सोमवार व मंगळवारी दिवसभर गर्दी होती. राखी मेलसाठी पोस्टाने वेगळी पाकिटे छापली आहेत. ही पाकिटे जिल्ह्यातील कार्यालयात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. ग्राहकांना सेवा देण्यासाठी पोस्टाने हा नवा उपक्रम सुरू केला आहे.
राखी पाठविण्यासाठी ‘मेलबॉक्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:48 AM