पिंपरी : छोटा राजन गँगचा सदस्य असलेला सराईत गुन्हेगार ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले आहे. तसेच यात एका नायजेरियन आरोपीचाही समावेश आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडून या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.
मुख्य सूत्रधार तुषार सूर्यकांत काळे (रा. बोरीवली) आणि राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई) आणि नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा. झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी तुषार काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी त्याचा संबंध आहे. नायजेरियन आरोपी झुबी इफनेयी उडोको हा एका अमली पदार्थांच्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा भोगून आला आहे. त्याने त्याच्या व्हिसामध्ये देखील छेडछाड केली असल्याचे समोर आले आहे.
एनसीबीकडूनही सूत्रधारांचा शोध सुरूपोलिसांनी सुरुवातीला किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे या आरोपींना अटक केली. रांजणगाव येथील संयोग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हे ड्रग्ज बनवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कंपनी सील केलीे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सहा पथकांनी कांदिवली, मुंबई, वसई, पालघर, नाशिक, नवी मुंबई कर्जत आणि सहारा विमानतळ, मुंबई येथे सात दिवस पहारा देत तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर या दोन्ही सूत्रधारांना ताब्यात घेतले. त्यांचा एनसीबीची (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युराे) पथके देखील शोध घेत आहेत.