पिंपरी चिंचवड: मनमानी करणारे ठेकेदार,अकुशल कामगार व महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या मेहेरबान अधिकाऱ्यांमुळे शनिवारी (दि . ७) चिंचवडमधील दळवीनगरात पहाटे नव्याने टाकलेली पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.या गंभीर प्रकारामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.यासाठी खोदकाम करण्यात आले. मुख्य जलवाहिनीतुन पहाटे पाणी सोडण्यात आले.मात्र निकृष्ट केलेल्या कामामुळे नव्याने टाकलेली पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.या प्रकारामुळे दळवीनगर भागात पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली.तब्बल दोन तास या जलवाहिणीतून पाण्याची नासाडी सुरू होती.येथील खड्यात साठलेल्या पाण्यामुळे खोदकामाचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचे व पादचाऱ्यांचे हाल झाले.दळवीनगरपासून ते प्रेमलोक पार्क पर्यंतच्या रस्त्यावर पाणी वाहत होते.या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदले जात आहेत.मात्र कामाची अर्धवट माहिती असणारे अकुशल कामगार हे काम करत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून या कडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.आज रात्री उशिरापर्यंत मुख्य पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू होते.पहाटे या पाईपलाईनची जोडणी तुटल्याने पाण्याची नासाडी झाली.संपुर्ण परिसर जलमय झाला होता.या मुळे नागरिकांचे व वाहन चालकांचे हाल झाले.या प्रकारात दोषी असणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.पाण्याच्या प्रेशरमुळे या भागात मोठे खड्डे झाले आहेत.याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने येथे अडकून पडली होती.स्थानिक कार्यकर्ते मदतीला धावल्याने अनेकांची सुटका झाली.या भागातील पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले.या घटनेची आयुक्तांनी दखल घ्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
पाणी पुरवठा विभागाचा अजब कारभार ; नव्याने टाकलेली मुख्य पाईपलाईनच फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 1:41 PM
नागरिकांचे हाल; निकृष्ट कामामुळे पाईपलाईन फुटल्याची टीका
ठळक मुद्देदोषी असणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्त्यांचे खोदकाम