लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : येथील एका शेतकऱ्याच्या शेतात काढणी केलेल्या मका पिकाच्या कडब्यावर शेतातून गेलेल्या विजेच्या तारांच्या घर्षणाने ठिणग्या पडून आग लागली. त्यात एक एकर क्षेत्रावरील मका जळून गेली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली असून, यात सुमारे २५ हजार रुपयांची मका जळून नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे. किवळे गावातील शेतकरी रवींद्र चव्हाण यांची केवलेश्वर मंदिराजवळ पवना नदीकाठाच्या बाजूला शेती आहे. त्यांनी शेतात मका पीक घेतले होते. मका काढून त्यांनी शेतात अंथरूण सुकण्यासाठी ठेवली होती. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वारा सुटला होता. वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातून जाणाऱ्या दोन खांबांवरील तारा एकमेकींना घासून ठिणग्या पडायला सुरुवात झाली. ठिणग्यांमुळे शेतातील मका पेटली. दहा-पंधरा मिनिटांच्या अवधीत मका जळून गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विजेच्या ठिणग्यांनी जळाले मक्याचे पीक
By admin | Published: June 10, 2017 2:06 AM